दहावीत शिकणाऱ्या मुलीचा मृतदेह एका विहिरीत सापडल्यानंतर तीन दिवसांनी त्याच विहिरीत १८ वर्षीय तरुणीचा हाडांचा सापळा सापडल्याने तेलंगणातील गावात खळबळ माजली आहे. ही तरुणी गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होती. दोन तरुणींचे मृतदेह आणि अजून एक तरुणी बेपत्ता असल्याने स्थानिक घाबरले असून तपास अधिकाऱ्यांना ही सगळी प्रकरणं एकमेकांशी संबंधित असल्याची शक्यता वाटत आहे. तरुणींवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचाही पोलिसांना संशय आहे.

गेल्या गुरुवारी दहावीत शिकणारी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मुलगी शाळेतून घरी परतत असताना बेपत्ता झाल्याची माहिती पालकांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तपास केला असता त्यांनी तिची शाळेची बॅग आणि जवळ दारुच्या बाटल्या सापडल्या. तेलंगणा पोलिसांनी तपास केला असता एका विहिरीत मुलीचा मृतदेह आढळला.

मुलगी बेपत्ता झाल्याने आणि मृतदेह सापडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यात आलं होतं, यासोबत तोडफोडही करण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत काहीजणांना ताब्यात घेतलं होतं. यामध्ये ज्या विहिरीत मृतदेह सापडला त्या शेतजमिनीच्या मालकालाही ताब्यात घेण्यात आलं.

याचा तपास सुरु असतानाच पोलिसांना १८ वर्षीय तरुणीचा दुसरा मृतदेह आढळला. ‘तरुणी बेपत्ता होती आणि ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यामुळे तिच्या पालकांनी अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल केली नव्हती’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी नारायण रेड्डी यांनी म्हटलं आहे.

तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मला चार मुलं असून ती सर्वात लहान होती. तिचा लवकर शोध लागेल अशी अपेक्षा आम्हाला होती. मुलीच्या हाडांचा सापळा सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अश्रू आवरत नव्हते. मृतदेहाशेजारी असणाऱ्या बॅगेतील पुस्तकांवर नाव लिहिलं असल्यानेच तिची ओळख पटली. यासोबत बस पास आणि ओळखपत्रही होतं.

शेतजमीन मालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर पोलिसांना संशय असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आंध्र प्रदेशात एका सेक्स वर्करची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्या घऱी जाऊन तोडफोड केली आणि जाळपोळ केली.

‘घरापासून चार किमी अतंरावर असणाऱ्या शाळेत जातानाही मुली सुरक्षित नाहीत. आमच्या मुलींना शाळेत पाठवणं थांबवलं पाहिजे का ?’, अशी विचारणा एका संतप्त ग्रामस्थाने केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असून अजून एका दांपत्याने आपली मुलगी २०१५ पासून बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे.