26 January 2021

News Flash

करोनामुक्त रुग्णांना पुन्हा होऊ लागलाय संसर्ग, जगासमोर नवं संकट

युरोपमध्ये आढळले पुन्हा करोनाचा संसर्ग झालेले दोन नवे रुग्ण

करोनावर मात करुन ठणठणीत झालेल्या दोन व्यक्तींना पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोपमधील दोन रुग्णांना पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग झाल्याने अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी चिंता व्यक्त केली आहे. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर या विषाणूविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज शरीरात तयार होतात ज्यामुळे करोनाचा पुन्हा संसर्ग होत नाही असं आतापर्यंत मानलं जात होतं. मात्र हा समज खोटा असल्याचे मागील दोन दिवसांमध्ये समोर आलेल्या या तिसऱ्या प्रकरणामधून स्पष्ट झालं आहे. आता करोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्ती केली जात असल्याचे रॉयटर्सने म्हटलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार नेदरलॅण्ड आणि बेल्मजियममधील प्रत्येकी एका रुग्णाला पुन्हा करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही या पूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचार केल्यावर ते यामधून पूर्णपणे बरे झाले होते. मात्र आता पुन्हा त्यांना काही आठवड्यांच्या कालावधीमध्ये करोनाचा संसर्ग झाला आहे. मागील आठवड्यात हाँगकाँगमधील एका व्यक्तीला करोनामुक्त झाल्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा लागण झाल्याचे वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे अशाप्रकारे पुन्हा पुन्हा संसर्ग होत असेल तर करोनावरील लस किती प्रभावी ठरणार आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मात्र अशाप्रकारे पुन्हा संसर्ग होणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असेल तर कोरनाचा संसर्ग पुन्हा होण्याच्या धोका अधिक असल्याचे म्हणता येईल असं तज्ज्ञ सांगतात. केवळ काही प्रकऱणांवरुन करोनामधून ठिक झालेल्यांना पुन्हा करोनाचा संसर्ग होऊ शकतो असा दावा करणे सध्या घाईचे होईल असं तज्ज्ञ सांगात.

नक्की वाचा >> कोणत्या वयातील लहान मुलांनी मास्क घालावे आणि कोणत्या वयोगटातील मुलांनी नाही?; WHO ने दिली माहिती

हाँगकाँग विद्यापिठाचा दावा

करोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असल्याचा दावा यापूर्वी हॉगकाँग विद्यापीठानं केलं होता. हॉगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं की, “हॉगकाँगमधील एका व्यक्तीला दुसऱ्यांदा करोना झाल्याचं सिद्ध झालं आहे. ही नोंदणीकृत पहिलीच घटना आहे. ३३ वर्षीय आयटी कर्मचाऱ्याला एप्रिलमध्ये करोना झाला होता. त्यातून बरं झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्याला ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील स्पेनमधून परतल्यानंतर पुन्हा करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. करोना चाचणी केल्यानंतर हे समोर आलं,” असं संशोधकांनी म्हटलं होतं.

करोनाचा संसर्ग पुन्हा होत नाही असा दावा फोल

करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होत नसल्याचा दावा वारंवार केला जात असतानाच करोनामुक्त झालेल्या तीन व्यक्तींना पुन्हा करोना झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. करोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता कमी असते असा दावा तज्ज्ञांकडून केला जात होता. वॉशिग्टन विद्यापीठातील व्हायरोलॉजी लॅबमधील सहाय्यक संचालक अलेक्झांडर ग्रेनिंजर आणि फ्रेड हच कॅन्सर संशोधन केंद्राच्या संशोधकांनी ही माहिती दिली होती. आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या निरीक्षण गटातील सदस्यांनी अशाच प्रकारचा दावा केलेला आहे. करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा करोना होण्याचा धोका नाही, असं निरीक्षण या सदस्यांनी नोंदवलं होतं. मात्र, हॉगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी पुन्हा करोना होण्याचा धोका असल्याचा दावा केला असून मागील दोन दिवसांमध्ये जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशाप्रकारचे तीन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 5:53 pm

Web Title: two european patients re infected with coronavirus scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस
2 चिनी फायटर जेट्सचा वेध घेण्यासाठी भारताने तैनात केली ‘इग्ला’ सिस्टिम
3 प्रशांत भूषण यांनी आम्हाला दिलेला प्रतिसाद जास्त मानहानीकारक – सुप्रीम कोर्ट
Just Now!
X