अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर सोमवारी सकाळी सलग दोन स्फोटांनी हादरले. या स्फोटात २५ जण ठार तर ४५ हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहिला स्फोट शशदारक परिसरात झाला. त्यानंतर दुसरा स्फोट हा त्याच परिसरातील एनडीएस गुप्तचर कार्यालयाजवळ झाला. या स्फोटात एएफपी या वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार मराई शाह हे ठार झाले आहेत.

टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या स्फोटात अनेक पत्रकार जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे सर्व पत्रकार स्फोटाचे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते. सध्यातरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. काबूल पोलिसांचे प्रवक्ते दाऊद अमीन यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, हल्ल्यात मारले गेलेले आणि जखमी झालेले सर्वसामान्य नागरिक आहेत. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

मागील आठवड्यात काबूलमधील मतदार नोंदणी कार्यालयाजवळ झालेल्या स्फोटात ६० लोक ठार झाले होते. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हल्ल्यांची तीव्रता वाढेल असा इशारा सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली होती.