नवी दिल्ली : भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत दोन शल्यचिकित्सकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून ते लवकरच त्यासाठी रशियाला रवाना होणार आहेत.

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने या मोहिमेची तयारी सुरू ठेवली असून दोन फ्लाइट सर्जन म्हणजे शल्यचिकित्सक डॉक्टर्स हे त्यात सहभागी होणार आहेत. भारतीय हवाई दलातून या दोन डॉक्टरांची निवड करण्यात आली असून ते अवकाश वैद्यक शाखेतले जाणकार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अवकाशवीरांचे प्रशिक्षण ही मानवी अवकाश मोहिमेतील अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यात दोन शल्यचिकित्सकांचा समावेश करण्यात आला. अवकाशवीरांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांची निवड इस्रोने मानवी अवकाश मोहिमेसाठी केली असून त्यांचे प्रशिक्षण युरी गागारिन संशोधन व चाचणी अवकाशवीर प्रशिक्षण केंद्र या मॉस्कोतील ठिकाणी गेल्या वर्षीपासून सुरू आहे. युरी गागारिन हे अवकाशाची सफर करणारे जगातले पहिले अवकाशवीर होते. मध्यंतरीच्या काळात करोनामुळे रशियात टाळेबंदी लागू केल्याने भारतीय अवकाशवीरांचे प्रशिक्षण रखडले होते.

भारताचे हवाई शल्यचिकित्सक हे फ्रान्सलाही प्रशिक्षणासाठी जाणार आहेत पण तेथील प्रशिक्षण सैद्धांतिक पातळीवरचे असेल. फ्रान्स हा देश अवकाश वैद्यकात आघाडीवर असून मेडीस स्पेस क्लिनिक ही सीएनईएसची स्वतंत्र वैद्यक संस्था आहे. गगनयान ही भारताची मानवी अवकाश मोहीम २०२२ मध्ये तीन भारतीयांना अवकाशात घेऊन जाणार असून करोनामुळे ती रेंगाळली आहे.