दोन दिवसांत विद्यावेतन देण्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

नवी दिल्ली : रखडलेले विद्यावेतन तातडीने मिळावे यासाठी दिल्लीतील ‘सारथी’च्या सुमारे दोनशे लाभार्थी विद्यार्थ्यांनी सोमवारी जंतरमंतरवर आंदोलन केले. फेब्रुवारी महिन्यात अजूनही १३ हजार रुपयांचे विद्यावेतन न मिळाल्याने हे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

गेले चार दिवस राज्य सरकारशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी मंत्रालायाचा कारभार सांभाळणारे कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अखेर प्रतिसाद दिला. दोन दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या विद्यावेतनाचा निधी ‘सारथी’कडे जमा केला जाईल. तसेच, या आठवडय़ात दिल्लीभेटीत विद्यार्थ्यांच्या अन्य मागण्यांबाबतही चर्चा केली जाईल, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिल्याची माहिती लाभार्थी राजेश बोनवटे यांनी दिली.

मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी ‘सारथी’ संस्था स्थापन करण्यात आली आहे. सारथीतर्फे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लाभार्थी विद्यार्थाना शिष्यवृत्ती व दरमहा विद्यावेतन दिले जाते. डिसेंबरपासून विद्यावेतन वेळेवर मिळेनासे झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात १७ तारीख उलटली तरी विद्यावेतन जमा झालेले नाही. उलट, ‘सारथी’ने विद्यार्थ्यांना दिल्लीतील निवासाचा दाखला म्हणून भाडे करारची प्रत पाठवण्याचा आदेश काढला आहे. ‘सारथी’चे अधिकारी अडचणीत भर घालत आहे. त्यामुळे नाइलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. जंतरमंतर येथे खासदार संभाजी राजे आणि ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी वडेट्टीवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

  • दरमहा विद्यावेतन २ तारखेपर्यंत मिळावे.
  • मूळ योजनेनुसार १५.५ महिन्यांच्या विद्यावेतनाची हमी मिळावी.
  • यूपीएससी मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी २५ हजार रु.देण्याची व्यवस्था करावी.
  • सारथी’च्या स्वायत्ततेबाबत खुलासा करावा.