अमेरिकेत भारतीय वंशाच्या दोन जणांना एच १ बी व्हिसा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना आता २० वर्षे तुरुंगवास किंवा अडीच लाख डॉलर्सचा दंड होण्याची शक्यता आहे, असे न्याय विभागाने म्हटले आहे.
अतुल नंदा (वय ४६) व त्याचा भाऊ जितेन (वय ४४) या दोघांना व्हिसा मिळवताना गैरप्रकार केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले. त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने काही परदेशी व्यक्तींना अमेरिकेत आणले असा आरोप होता. त्यांना शिक्षा सुनावण्याची तारीख निश्चित झालेली नाही. सहा दिवस संघराज्य न्यायलयासमोर या प्रकरणी या दोघांची सुनावणी झाली आहे. अतुल नंदा व जितेन नंदा हे टेक्सासच्या डिबॉन सोल्युशन्सचे मालक आहेत. त्यांनी विशेष तज्ज्ञता आवश्यकता असलेल्या कामासाठी कर्मचाऱ्यांची परदेशातून भरती केली. त्यांनी त्यांच्या दिबॉन कंपनीच्या कॅरोलटन येथील मुख्यालयात कर्मचाऱ्यांची भरती केली पण प्रत्यक्षात त्या वेळी त्या कंपनीत संबंधित पदेच नव्हती, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्रयस्थ कंत्राटावर अमेरिकेतील इतर सल्लागार संस्थांसाठी सेवा देण्याचे काम देण्यात आले होते. नंदा बंधूंनी पूर्ण वेळ पदे असल्याचे दाखवून कर्मचाऱ्यांची भरती केली होती व व्हिसा नियमाप्रमाणे वार्षिक वेतन देत असल्याचे दाखवले होते, असा आरोप फिर्यादी पक्षाने केला होता. संघराज्य अभियोक्तयांनी असा आरोप केला, की डिबॉन कंपनी सेवा देताना तासाला शुल्क आकारत होती. त्यामुळे कंपनीसाठी हा व्यवहार फायद्याचा होता. त्यामुळे नंदा बंधूंना मोठय़ा प्रमाणावर नफा मिळाला शिवाय त्यांचा प्रत्यक्ष कामगारांवरील खर्च कमी होता. एच १ बी व्हिसा पद्धतीचा गैरवापर करून त्यांनी हा घोटाळा केला आहे.