भारतात दहशतवादी घुसवण्याच्या उद्देशाने पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्येे पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. पाककडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र, प्रत्युत्तर देताना दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. तर एका नागरिकाचाही मृत्यु झाला. त्यानंतर घुसखोरी हाणून पाडत भारतीय लष्कराने सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेली अनेक दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले. या कारवाईत पाकच्या पाच सैनिकासह २० ते २२ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याचे वृत्त आहे.

कलम ३७० रद्द केल्यापासून भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमधील सीमेलगतच्या तंगधार सेक्टरमध्ये रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून अचानक भारतीय चौक्यांसह सीमेलगतच्या गावांना लक्ष्य करण्यात आलं.

शस्त्रसंधी उधळून लावत पाकिस्ताननं गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देताना भारताचे दोन जवान शहीद झाले. तर एका नागरिकाचा मृत्यु झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकच्या गोळीबारात एक घर आणि तांदळाचे गोडाऊन जमीनदोस्त झाले असून, त्यामध्ये असलेल्या दोन कार, दोन गाई आणि १९ शेळ्या-मेंढ्या मरण पावल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.

पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारानंतर घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने हल्ला चढवला आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी उखळी तोफांचा वापर करण्यात आला. भारतीय लष्कराने केलेल्या धडाकेबाज कारवाईत नीलम व्हॅलीतील चार दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केली आहेत. भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या चार ते पाच सैनिकांसह २० ते २२ दहशतवादी ठार झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून काश्मीर खोरं आणि भारतात घातपात घडवून आणण्याचं प्रयत्न पाकिस्तानकडून केले जात आहे. मागील महिन्यात केंद्रीय गुप्तचर संस्थांनी याबद्दल सर्वच सुरक्षा यंत्रणांना सर्तक राहण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर काही काळ सीमेवर शांतता होती. मात्र, रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या आहेत.