पुलवामा हल्ल्याच्या कटातील आरोपी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी शनिवारी झालेल्या चकमकीत ‘जैश ए महंमद’चे दोन दहशतवादी ठार झाले. पुलवामा येथे २०१९ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहनांवर बॉम्बहल्ला करण्याच्या कटात ते सामील होते.

दाचीग्राम येथील नंबियान आणि मरसर या जंगली भागांत दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे सकाळपासून शोधमोहीम राबवली. या वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक दहशतवादी पाकिस्तानी आहे, परंतु त्याची अजून ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून त्याचा स्फोट घडवण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. हा स्फोट आत्मघाती बॉम्ब हल्लेखोर अदिल दर याने घडवून आणला होता.  पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्या एका दहशतवाद्याचे नाव महंमद इस्माल अल्वी ऊर्फ लंबू ऊर्फ अदनान असे आहे. तो ‘जैश ए महंमद’चा प्रमुख मासूद अझर याचा नातलग आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात सामील होते. राष्ट्रीय तपास संस्थेच्या आरोपपत्रातही त्याचे नाव होते.

एक अटकेत

जम्मू : दोन दहशतवादी कृत्यांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये १५ ठिकाणी छापे घातले. त्यात ‘लष्कर

ए मुस्तफा’च्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याचबरोबर डिजिटल साधने, गोळ्यांच्या पुंगळ्या, प्लास्टिकची मुखावरणे आणि जिहादबाबतची हस्तलिखिते जप्त करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वर्षभरात ८९ अतिरेकी ठार

’जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी ८९ दहशतवादी ठार झाले. त्यापैकी सात पाकिस्तानी होते, अशी माहिती वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

’जम्मू-काश्मीरमध्ये अद्याप २०० दहशतवादी सक्रिय आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या कमी आहे.

’परंतु या वर्षी दहशतवाद्यांचे अनेक म्होरके मारले गेल्याचे काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले.