उत्तराखंडमध्ये मंगळवारी झालेल्या हिमस्खलनात लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला, तर एक जवान बेपत्ता झाला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस होत आहे. त्यामुळे पिठोरगड जिल्ह्य़ात मंगळवारी हिमस्खलन होऊन भारत-चीन सीमेवरील लष्कराचे सियालेख येथील ठाणे बर्फाखाली गाडले गेले. त्यात दोन जवानांचा मृत्यू झाला, तर एक जवान बेपत्ता झाला.
बेपत्ता जवानाचा शोध घेण्यासाठी दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे. पण खराब हवामामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत, असे पिठोरगडचे जिल्हाधिकारी सुशील कुमार यांनी सांगितले.  
सियालेख येथील ठाण्यावर कुमाँव स्काऊट्सचे आठ जवान तैनात होते. त्यातील पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. दोन जवानांचे मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता जवानाचा पायी फिरून शोध घेण्यासाठी लष्कराचे पथक रवाना झाले आहे. ते मंगळवारी रात्रीपर्यंत परतण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अन्य एका घटनेत राज्यातील बागेश्वर जिल्ह्य़ातील कापकोट येथे सोमवारी रात्री घर कोसळून ढिगाऱ्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला.