सेनादलांमध्ये अपघात आणि दुर्घटनांतून ओढवणाऱ्या जीवितहानीची प्रथा अजून खंडित झाली नसून शुक्रवारी सायंकाळी कारवार किनाऱ्यालगत आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर झालेल्या विषारी वायू गळतीमुळे राकेशकुमार हे नौदलाचे चतुर्थश्रेणीतील कुशल तंत्रज्ञ तसेच रॉयल मरिनचा कर्मचारी मोहनदास कोळंबकर हे दोघे मृत्युमुखी पडले तर अन्य दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नौदलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य ही नौदलाची सर्वात मोठी नौका आहे. कर्नाटकातील कारवार येथे एक जूनपासून या नौकेची दुरुस्ती सुरू आहे.
या नौकेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही वायुगळतीची घटना घडली. मलनिस्सारण संयंत्र कक्षात देखभालीचे काम हाती घेण्यात आले होते. या वेळी श्वासासोबत विषारी वायू फुफ्फुसांत ओढला गेल्याने अस्वस्थ झालेले दोन नौसैनिक व दोन नागरिक अशा चौघांना कारवारच्या नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू ओढवला.