दोन मजली इमारत कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला असून सहा मजूर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन याबद्दल चौकशी केली.

उत्तरप्रदेशमधल्या वाराणसीमध्ये काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात बांधकाम सुरु असलेली एक दुमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार पश्चिम बंगालमधल्या माल्डा भागातले रहिवासी आहेत. हे सर्व कामगार या इमारतीमध्येच राहत असत.

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांच्याशी संवाद साधला आणि लागेल ती सगळी मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे.
शर्मा यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये शर्मा म्हणाले, पंतप्रधानांनी मृतांच्या परिवारांचं सांत्वन केलं आहे, तसंच सर्व जखमींची योग्य काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा यांनी सांगितलं की मृतांच्या परिवारांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमींच्या परिवाराला प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्यात येणार आहे.