जिल्ह्य़ात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना संमिश्र यश

सीमालढय़ाच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरलेल्या बेळगाव जिल्हय़ातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाचपैकी दोन उमेदवारांनी विजय मिळविला. मराठी भाषकांच्या ऐक्याचा हा विजय मानला जात आहे. जिल्हय़ात भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांना चांगल्या प्रमाणात यश मिळाले.

महापालिकेच्या निवडणुकीतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये एकीकरण समितीचे उमेदवार रिंगणात होते. बेळगाव दक्षिण मतदारसंघात चार वेळा महापौरपद भूषविलेले संभाजी पाटील यांनी भाजपचे आमदार अभय पाटील यांचा ६,३१० मतांच्या फरकाने पराभव केला. संभाजी पाटील यांना ५४,४२६ तर अभय पाटील यांना ४८, ११६ मते पडली. खानापूर मतदारसंघातही एकीकरण समितीचे अरविंद पाटील यांनी तब्बल ३१ हजार मताधिक्य घेत धवल यश प्राप्त केले. त्यांना ३७ ,०५५ मते पडली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अंजली हेमंत निंबाळकर यांना १७ हजार ६८७ मते तर भाजपचे आमदार प्रल्हाद नेमाणे यांना १६०२१ मते मिळाली. 

बेळगाव ग्रामीणमधील माजी आमदार मनोहर किणेकर यांचा निसटता पराभव मराठी भाषकांच्या मनाला वेदना देणारा ठरला. मराठी भाषकांची दुफळी येथे पराभवास कारणीभूत ठरली. किणेकर यांना ३६ हजार ९३८ मते मिळाली. तर भाजपचे आमदार संजय पाटील ३८, ३२२ मते घेऊन पुन्हा विधानसभेत पोहोचले.

शिवाजी सुंठकर या मराठी भाषक उमेदवारास १५ हजार मते मिळाली. बेळगाव उत्तर मतदारसंघात एकीकरण समितीच्या रेणू किल्लेदार यांना १८, ५७० मतांना पराभूत व्हावे लागले. तेथे  विजयाची पुनरावृत्ती करताना काँग्रेसचे आमदार फिरोज शेठ यांनी १५,१२५ मते प्राप्त केली.    

जिल्हय़ात भाजप व काँग्रेसला चांगले यश मिळाले. निपाणी मतदारसंघात ‘जो-जो फॅक्टर’ लाभदायक ठरला. माजी आमदार सुभाष जोशी यांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे उमेदवार शशिकला ज्वोल्ले यांनी १८ हजार मताधिक्य घेत काँग्रेसचे आमदार काकासाहेब पाटील यांना पराभूत केले. येथे एकीकरण समितीच्या बाबासाहेब देसाई यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. राजू कागे (कागवाड), अरुण ऐवळे (रायबाग), उमेश कत्ती (हुक्केरी), लक्ष्मण सवदी (अथणी) या भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली.

सतीश जारकीहोळी (यमकनमर्डी), प्रकाश हुक्कीरे (सदलगा) या काँग्रेस उमेदवारांनी तसेच बी.एस.आर. काँग्रेसचे पी. राजू यांनी कुडची मतदारसंघात यश मिळविले. सीमाभागात त्यामुळे समधान व्यक्त होत आहे.