वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून केंद्रातील यूपीए सरकारविरोधात दोन खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस गुरुवारी दाखल केली. कॉंग्रेसचे खासदार सब्बम हरी आणि तेलगू देसम पक्षाचे एम. वेणूगोपाल रेड्डी यांनी गुरुवारी सकाळी अविश्वास प्रस्तावाची नोटीस लोकसभेच्या अध्यक्षांकडे दिली. दोन्ही खासदारांनी स्वतंत्रपणे यूपीए सरकारविरोधात नोटीस दिली आहे.
१५ व्या लोकसभेच्या अखेरच्या अधिवेशनाला बुधवारी सुरुवात झाल्यानंतर वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात आंध्र प्रदेशमधील खासदारांनी गोंधळ घातला. त्यामुळे पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी दोन खासदारांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली.
डिसेंबरमध्ये झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही सीमांध्र भागातील कॉंग्रेसच्या सहा खासदारांनी आपल्याच सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यान, अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी कमीत कमी ५० सदस्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. १५ व्या लोकसभेत आतापर्यंत यूपीए सरकारविरोधात एकदाही अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही.