श्रीलंकेत पावसामुळे अचानक पूर आले असून दोन लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. एकूण अकराजण पुरात मरण पावले आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते प्रदीप कोडीपल्ली यांनी सांगितले की, २५ जिल्ह्य़ांपैकी १९ जिल्ह्य़ात पावसाने पूर आले असून अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. एकूण ४७,९२२ कुटुंबे व २,०७,५५६ लोकांना या पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्तांसाठी १७६ शिबिर छावण्या उभारण्यात आल्या असून तीन दिवसात १,३४,००० लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी सांगितले की, एक महिला व दोन मुलांचा भूस्खलनात मृत्यू झाला व त्यामुळे दोन दिवसात बळी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे. आणखी सहाजण बेपत्ता आहेत. एकूण ६८ घरे या पुरात वाहून गेली आहेत. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोला मोठा फटका बसला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमी दाबाच्या पट्टय़ामुळे जोरदार पाऊस झाला असून हा पट्टा आता दक्षिण भारताकडे सरकला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.