प्रसिद्ध बिस्किट नाममुद्रा पारले-जीच्या ढासळत्या विक्रीपायी कंपनीच्या १० हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागण्याच्या वृत्ताने महिन्यापूर्वी खळबळ निर्माण केली होती. पण, बिस्किटांचं उत्पादन करणाऱ्या पारले प्रोडक्ट्स समूहाच्या निव्वळ नफ्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये १५.२ टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे पारलेसह बिस्किटांचं उत्पादन घेणाऱ्या अन्य काही कंपन्यांनी बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केल्याच्या दोन महिन्यांनतरच ही आकडेवारी समोर आली आहे.

‘टॉफलर’ या बिझनेस प्लॅटफॉर्मने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ४१० कोटी रुपये इतका पारलेचा निव्वळ नफा झाला. तुलनेने गेल्या वर्षी हा नफा ३५५ कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीच्या निव्वळ नफ्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये १५.२ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या एकूण महसूलातही ६.४ टक्क्यांनी वाढ झाली असून ९ हजार ३० कोटी रुपये इतका महसूल झाला आहे. याशिवाय कंपनीच्या इतर उत्पन्नही २६ टक्क्यांनी वाढून २५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यातच कंपनीने, बिस्किटांवरी १८ टक्के जीएसटी दर कमी न केल्यास ८ ते १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची वेळ येऊ शकते असा इशारा दिला होता. उपभोक्त्यांकडून बिस्किटांची मागणी घटल्यामुळे पारले कंपनीतील 10 हजार जणांची नोकरी जाऊ शकते. त्यासाठी 100 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी पारलेकडून करण्यात आली होती.