काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती कमी होताना दिसत नाही. दहशतवाद्यांनी आता ड्रोनच्या मदतीने लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला केल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न केला. जम्मूच्या कालूचक लष्करी तळाजवळ रात्रीच्या सुमारास दोन ड्रोन दिसले. पहिलं ड्रोन रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी, तर दुसरं ड्रोन रात्री २ वाजून ४० मिनिटांनी दिसलं. मात्र सतर्क लष्कराने त्या ड्रोनवर हल्ला चढवला. गोळीबार केल्यानंतर ड्रोन बेपत्ता झालं. सध्या जवान या भागात सर्च ऑपरेशन करत आहेत. या घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलीस राजमार्गावर वाहनांची तपासणी करत आहे.

“२७ आणि २८ जूनच्या मध्यरात्री जम्मूच्या रत्नूचक कालूचक लष्करी तळावर ड्रोन दिसल्याचे दोन घटना समोर आल्या आहेत”, असं जम्मूतील संरक्षण मंत्रालयातील प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितलं. जम्मू एअरफोर्स स्टेशनवर रविवारी रात्री दोन स्फोट झाले होते. एक स्फोट रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी झाला होता. त्यानंतर दुसरा स्फोट पाच मिनिटांनी १ वाजून ४२ मिनिटांना झाला होता. पहिल्या स्फोटात छताचं नुकसान झालं होतं. तर दुसरा स्फोट खुल्या जागेत झाल्यानं दोन जवान किरकोळ जखमी झाले होते. ड्रोनचा माग काढण्यासाठी तपास अधिकारी विमानतळाच्या संरक्षक भिंतींवर लावलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणासह अन्य ठिकाणचे चित्रणही तपासत आहेत. ड्रोन कोठून आले, याचा शोध घेतला जात आहे. परंतु सर्व सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या कडेला असल्याने त्यातून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता धूसर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाल किल्ला हिंसाचार : एक लाख रुपये बक्षिस असलेल्या गुरजोत सिंगला अटक

जम्मू विमानतळ आणि एअरफोर्स स्टेशन भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेपासून १० किलोमीटर लांब आहे. सर्वात जवळ मकवाल सीमा आहे. मात्र एवढ्या लांबून ड्रोन येणं कठीण आहे. त्यामुळे एअरफोर्सच्या जवळूनच हे ड्रोन ऑपरेट केल्याचा संशय लष्कराला आहे. ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांना जास्त खर्च येत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांनी आता ड्रोनच्या मदतीने हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लष्कराला आता अधिक सक्षमपणे ड्रोन हल्ले परतवून लावण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.