केरळमधील बार लाचप्रकरणी हॉटेलमालक बिजू रमेश यांनी गृहमंत्री रमेश चेन्निथला आणि आरोग्यमंत्री व्ही. एस. शिवकुमार यांच्यावर आरोप केल्याने यूडीएफ सरकारच्या अडचणींमध्ये आता अधिकच वाढ झाली आहे. एका मल्याळी दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी होताना बिजू रमेश यांनी चेन्निथला आणि शिवकुमार यांच्यावर आरोप केले. चेन्निथला हे २०१२ मध्ये केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांना दोन कोटी रुपये दिले तर शिवकुमार यांना २५ लाख रुपये दिल्याचे बिजू रमेश म्हणाले.
बिजू रमेश यांनी यापूर्वी अर्थमंत्री के. एम. मणी आणि अबकारीमंत्री के. बाबू यांच्यावरही लाच घेतल्याचे आरोप केले होते. याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर मणी यांना राजीनामा द्यावा लागला होता. बाबू यांनीही पदाचा राजीनामा दिला मात्र यूडीएफच्या विनंतीवरून त्यांनी तो मागे घेतला.
रमेश चेन्निथला यांच्याकडे थेट रक्कम सुपूर्द करण्यात आली तर शिवकुमार यांच्या खासगी सचिवाकडे रक्कम देण्यात आली, असा दावा बिजू रमेश यांनी केला आहे. नेय्यटिंकरा येथील पोटनिवडणुकीपूर्वी ही रक्कम त्यांना देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.