वॉशिंग्टन : अवकाश इतिहासात प्रथमच अमेरिकेच्या दोन महिलांनी एकाचवेळी स्पेसवॉक केले. आतापर्यंत महिलांनी स्पेसवॉक केले नाही अशातला भाग नाही, पण आताच्या स्पेसवॉकमध्ये केवळ महिलाच होत्या.

या दोन महिलांमध्ये ख्रिस्तिना कॉच, जेसिका मेयर यांचा समावेश आहे. शुक्रवारी या दोन महिलांच्या जोडीने स्पेस वॉक केले. गेल्यावेळी स्पेससूटमध्ये समस्या निर्माण झाल्याने हा ऐतिहासिक स्पेस वॉक रद्द करावा लागला होता.

ख्रिस्तिना, तू मोठा तिढा दूर केलास, असा संदेश अवकाशयानाच्या संदेशकर्त्यां स्टीफनी विल्सन यांनी दिला. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या पॉवर कंट्रोलरची दुरूस्ती करण्यासाठी या दोघी अवकाशस्थानकाबाहेर पडल्या. प्रमाणित सुरक्षा तपासणी करून त्यांनी अवकाशस्थानकाबाहेर पाऊल ठेवले. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाइन यांनी सांगितले, की केवळ महिलांचा सहभाग असलेला स्पेसवॉक ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कॉच या विद्युत अभियंता असून, मेयर या सागरी जीवशास्त्रात पीएचडी आहेत. सोविएत रशियाची व्हॅलेंतिना तेरेश्कोवा ही १९६३ मध्ये पहिली महिला अवकाशयात्री ठरली होती. १९८२ मध्ये स्वेतलाना सावित्स्काया ही पहिली महिला स्पेसवॉकर ठरली होती.