सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात दोन नवीन उपकर लावले असून त्यात कृषी कल्याण उपकर व पायाभूत सुविधा उपकर यांचा समावेश आहे. याशिवाय आधी असलेले तेरा उपकर काढून टाकले आहेत. वर्षभरात या तेरा उपकरातून ५० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकले नाही त्यामुळे ते काढण्यात आले. नवीन दोन उपकरांमुळे उत्पन्न आठ हजार कोटींनी वाढणार आहे. त्यात कृषी कराने ५ हजार कोटी तर पायाभूत कराने ३ हजार कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल. एकूण पाच उपकरात ५४४५० कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.

कृषी कल्याण उपकर हा सर्व करपात्र सेवांवर लावला जाणार असून तो ०.५ टक्के असेल. १ जून २०१६ पासून तो लागू केला जाईल. कृषिक्षेत्राला हातभार लावण्यासाठी हा उपकर लागू केला आहे. या उपकरामुळे सेवा कर ०.५ टक्के वाढणार असून तो १५ टक्के होणार आहे.

पायाभूत सुविधा उपकर हा पेट्रोल, एलपीजी व सीएनजी मोटारींवर १ टक्का लावला जाणार असून डिझेल मोटारींवर २.५ टक्के लावला जाणार आहे. एसयूव्ही, मोठी सेडान वाहने व २००० सीसी तसेच त्यापुढच्या वाहनांवर ४ टक्के उपकर लावला जाईल. तीन चाकी वाहने, विद्युत वाहने, संमिश्र तंत्रज्ञान असलेली वाहने, हायड्रोजनवरची वाहने यावर पायाभूत सुविधा उपकर लागू असणार नाही. टॅक्सी, रुग्णवाहिका, अपंगांसाठीची वाहने यावरही हा उपकर लागू असणार नाही.

स्वच्छ ऊर्जा उपकर हा कोळसा, लिग्नाइट यावर लागू केला असून त्याला आता स्वच्छ पर्यावरण उपकर असे नाव दिले आहे. हा उपकर नवा नाही त्यात वाढ केली आहे. तो मेट्रिक टनाला २०० रुपये होता आता तो ४०० रुपये राहील. त्यामुळे कोळशापासून वीजनिर्मितीचा खर्च युनिटमागे १५ पैसे वाढणार आहे.