एकूण बळींची संख्या १०७
मक्का येथे मोठय़ा मशिदीतील बांधकामाचा क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १०७ झाली असून त्यात केरळचे दोन भारतीय मरण पावले आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.
खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नवी दिल्ली येथे सांगितले की, दोन भारतीयांचा या घटनेत मृत्यू झाला. जेद्दाह येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी मदत करीत असून त्यांनी २४ तास हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे. तेथील स्थितीवर अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. यात पंधरा भारतीय जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयात दाखल केले आहे. भारताच्या हाज समितीच्या ११ जणांचा व खासगी सहल आयोजकांपैकी ४ जणांचा जखमीत समावेश आहे. मक्का येथील मशिदीजवळ मोठा क्रेन कोसळून १०७ जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. हाज यात्रेच्या आधी ही दुर्घटना घडली आहे. क्रेनचा काही भाग जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे कोसळला. हजारो मुस्लिम भाविक हाज यात्रेसाठी मक्केला आले आहेत. सौदी अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आठ लाख मुस्लिम हाज यात्रेसाठी आले आहेत. दोन मशिदींचे प्रवक्ते महंमद अल मन्सुरी यांनी सांगितले की, सायंकाळी ५.१० वाजता क्रेनचा काही भाग कोसळला. अब्दुल अझीज नकूर यांनी क्रेन कोसळताना पाहिली. अल तवाफ पुलाच्या ठिकाणी ही घटना घडली नसती तर मृतांची संख्या वाढली असती असे त्यांनी सांगितले. ट्विटरवर घटनेची छायाचित्रे टाकण्यात आली असून सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला दिसत आहे. यू टय़ूब व्हिडिओवर लोक ओरडताना दिसत आहेत. हाज यात्रा २१ सप्टेंबरला सुरू होत आहे. मक्का भागाचे राजपुत्र खालेद अल फैजल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मशिदीचा परिसर चार लाख चौरस मीटरने वाढवण्याचे काम सुरू असताना हा क्रेन कोसळला आहे. त्यामुळे एकावेळी २२ लाख लोक तेथे उपस्थित राहू शकतील. गेल्या वर्षी वीस लाख मुस्लिम भाविक हाज यात्रेला आले होते.