अमेरिकेत दोन विमानांची हवेत धडक झाल्याची घटना समोर आली आहे. इदाहो येथे या दोन विमानांची हवेत धडक झाली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटना झाली तेव्हा एका तळ्याच्या वरती ही विमानं उड्डाणं करत होती. यानंतर दोन्ही दुर्घटनाग्रस्त विमानं तळ्यात कोसळून बुडाली आहेत.

स्थानिक प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुर्घटनेनंतर लगेचच प्रशासनाला यासंबंधी माहिती मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान विमानं बुडण्याआधी दोन मृतदेह हाती लागले असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दोन मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरु आहे. दरम्यान विमानातील इतरांचाही मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. अपघाताचं नेमकं कारण अद्याप कळलं नसून, दोन्ही विमानात एकूण नेमके किती प्रवासी होते याचीही माहिती घेतली जात असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.