केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन वाद पेटला असून हिंसक वळण लागलेलं दिसत आहे. महिलांना प्रवेश देण्यावरुन अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून त्याचं चित्रीकरण करणाऱ्या दोन पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे. द न्यूज मिनिट आणि रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांना आंदोलकांनी मारहाण केली असून ते जखमी झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर रोजी अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी रद्दबातल ठरवली. यानंतर आज संध्याकाळी मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडले जाणार आहेत. मात्र महिलांना प्रवेश न मिळण्यावर काही संघटना ठाम असून आंदोलन करत आहेत.

द न्यूज मिनिटने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची पत्रकार शबरीमला मंदिरात भक्तांना घेऊन राज्य परिवहनच्या बसमधून प्रवास करत होती. यावेळी 20 जणांच्या जमावाने बसवर हल्ला करत रिपोर्टरला खाली खेचलं. हा जमाव कर्मा समितीचे असल्याचं सांगितलं जात आहे. महिला पत्रकाराशी वाद घालत मारहाण करण्यात आली. जमावातील एका व्यक्तीने पत्रकाराला लाथ घातल्याचंही सांगण्यात आलं आहे.

‘तिला मागून लाथ घालण्यात आली. यावेळी संतप्त आंदोलनकर्ते तिचा फोटो काढत, उद्धट भाषेत बोलत अय्यपाच्या नावे घोषणा देत होते. एका महिलेने तिच्यावर पाण्याची बाटली फेकण्याचाही प्रयत्न केला’, असं वृत्त द न्यूज मिनिटने दिलं आहे.

दरम्यान रिपब्लिक न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 100 जणांच्या जमावाने कारची तोडफोड करत दक्षिण भारत ब्यूरो चीफ पूजा प्रसन्ना यांना मारहाण केली. जमावाने पोलिसांकडून काठ्या खेचून घेत पत्रकार आणि इतरांवर हल्ला केला.

आज सकाळी दोन महिलांनी प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली होती. मात्र आंदोलकांना रस्त्यातच त्यांना थांबवलं. आंध्र प्रदेशातील एका महिलेने काही किमी अंतर पार केल्यानंतर पांबा बेस कॅम्पजवळ रोखण्यात आलं.

सर्व वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी संध्याकाळी मासिक पुजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडले जाणार आहे. मात्र, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना तिरुअनंतपूरममध्ये एका महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अयप्पा मंदिर बुधवारपासून महिन्याभराच्या पूजेसाठी उघडले जाणार आहे. पण त्याचवेळी या निर्णयाविरोधात आंदोलन जोर पकडू लागले आहे.

अय्यप्पाच्या भाविक महिलांनी शबरीमला मंदिराकडे निघालेल्या १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली व महिलांना रोखल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे. महिनाभराची यात्रा राजघराण्याच्या पूजेने सुरू होते; परंतु महिलांच्या प्रवेशास विरोध करणारे मुख्य पुजारी बुधवारी पूजेसाठी न येण्याची शक्यता आहे. महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने २८ सप्टेंबर रोजी अय्यप्पा मंदिरात दहा ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी रद्दबातल ठरवली. शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले होते.