वॉशिंग्टन : अवकाशात दोन उपग्रहांची टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांची नावे आयआरएएश व जीजीएसइ ४ अशी आहेत. ते एकमेकावर आदळण्याची शक्यता ही शंभरात १ इतकी आहे.

या उपग्रहांची टक्कर रोखण्यासाठी कोणताही उपाय नाही, कारण ते निकामी उपग्रह असून त्यांच्याशी संपर्क साधणारी कुठलीही यंत्रणा चालू नाही. प्रत्यक्ष टकरीपेक्षा यातून निर्माण होणारा अवकाश कचरा ही मोठी डोकेदुखी आहे.

दी इन्फ्रारेड अस्ट्रॉनॉमिकल सॅटेलाइट व ग्रॅव्हिटी ग्रॅडिअंट स्टॅबिलायझेशन एक्सपिरिमेंट (जीजीएसइ ४) हे दोन उपग्रह ताशी १४ किमी वेगाने प्रवास करीत असून लिओलॅबच्या माहितीनुसार ते एकमेकांवर आदळण्याची शक्यता शंभरात एक आहे. कदाचित ते एकमेकांजवळून जातील व टक्कर १५ ते ३० मीटरच्या अंतर फरकाने टळू शकते. हे उपग्रह निकामी असल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण आहे. यापूर्वी काही उपग्रह साठ किलोमीटर जवळ आले होते, आताच्या उपग्रहांमध्ये तर हे अंतर कमी आहे. आयआरएएस उपग्रह १०८३ किलोचा असून जीजीएसइ उपग्रह ४.५ किलो वजनाचा आहे. उपग्रह एकमेकांवर आदळले तर अवकाश कचरा निर्माण होतो. भारताने मिशन शक्तीमध्ये उपग्रहभेदी क्षेपणास्त्राने एक उपग्रह फोडला होता त्यामुळे अवकाश कचरा निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती. अवकाश कचरा पृथ्वीवर पडण्याची स्थिती आली तरी तो तेथून खाली येताना आकाशातच जळून जातो. पृथ्वीच्या कक्षेत एलन मस्क यांच्या स्टारलिंकचे १२ हजार उपग्रह सोडले जाणार आहेत. एकूण ३० हजार उपग्रह सोडण्याची त्यांची योजना आहे. सध्या पृथ्वीच्या कक्षेत चालू अवस्थेतील दोन हजार उपग्रह असून निकामी उपग्रहांसह एकूण नऊ  हजार उपग्रह फिरत आहेत.

२,०००.. पृथ्वीच्या कक्षेत सध्या कार्यरत असलेले एकूण कृत्रिम उपग्रह.

७,०००.. पृथ्वीच्या कक्षेत असलेले एकूण निकामी कृत्रिम उपग्रह.

९,०००.. पृथ्वीच्या कक्षेतील कार्यरत आणि निकामी असे एकूण कृत्रिम उपग्रह.