अनिल अंबानींसाठी न्यायालयीन आदेशात फेरफार 

रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरुद्धच्या एका अवमान प्रकरणात त्यांना अनुकूल ठरेल अशा प्रकारे न्यायालयाच्या आदेशात फेरफार केल्याच्या प्रकरणात चौकशीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन सहायक प्रबंधक (असिस्टंट रजिस्ट्रार) बडतर्फ केले आहे.

संबंधित न्यायमूर्तीचा आदेश लिहून घेऊन तो सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी जबाबदार असलेल्या दोन न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी बुधवारी जारी केला.

अवमान प्रकरणाची सुनावणी करणारे न्या. रोहिंटन नरिमन यांच्या तक्रारीच्या आधारे कारवाई करताना सरन्यायाधीशांनी, शिस्तभंगाच्या सामान्य कार्यवाहीचा अवलंब न करता ‘असामान्य परिस्थितीत’ कुठल्याही कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार देणाऱ्या घटनेच्या अनुच्छेद ३११ अन्वये, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या कलम ११(३) अन्वये मिळालेल्या त्यांच्या अधिकारांचा वापर केला.

अनिल अंबानी यांनी न्यायालयाला स्पष्ट हमी दिली असतानाही ‘एरिक्सन इंडिया’ची देणी चुकवण्यात ते अयशस्वी ठरल्यामुळे न्यायालयाने त्यांना अवमान नोटीस बजावली होती. न्या. नरिमन यांच्या या आदेशात फेरफार करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे सरन्यायाधीशांनी हे असामान्य पाऊल उचलले.

‘कथित अवमानकर्त्यांच्या वैयक्तिक उपस्थितीचा मुद्दा निकाली काढण्यात येत आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर ७ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले होते. सुनावणीच्या पुढील तारखेला अंबानी यांची उपस्थिती आवश्यक नसल्याचे यातून ध्वनित होत होते. प्रत्यक्षात, ज्याला अवमानाची नोटीस जारी केली आहे त्याने एकदा न्यायालयात हजर राहावे आणि पुढील तारखांना वैयक्तिक उपस्थितीपासून सूट मिळण्याची विनंती करावी, असा नियम आहे.

अंबानी यांच्या वैयक्तिक उपस्थितीचा मुद्दा निकाली काढण्यात आलेला नसल्याचे न्या. नरिमन यांनी काही तासांपूर्वी म्हटलेले असतानाही, अंबानी यांना फायदेशीर ठरणारा आदेश संकेतस्थळावर टाकण्यात आला होता. ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि एरिक्सनच्या इतर प्रतिनिधींनी न्या. नरिमन यांना भेटून ही विसंगती त्यांच्या लक्षात आणून दिली. नरिमन यांनी हे धक्कादायक असल्याचे सांगून सुधारित आदेश १० जानेवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध करायला लावला.

हेतुपुरस्सर फेरफार

न्या. नरिमन यांनी संबंधित न्यायालयीन अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीची सूचना केली. सरन्यायाधीशांनी केलेल्या चौकशीत, या अधिकाऱ्यांनी आदेशात हेतुपुरस्सर फेरफार केल्याचे आढळले. त्यानुसार, सहायक प्रबंधकांचा दर्जा असलेले कोर्ट मास्टर मानव शर्मा व तपन कुमार चक्रवर्ती यांच्या बडतर्फीचा आदेश बुधवारी सायंकाळी जारी करण्यात आला.