इंदौरमधल्या दोन वरिष्ठ सरकारी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यातल्या एकीने राजीनामा दिला असून दुसरीने राजीनामा देण्याचा इशारा देत रजा घेतली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पूर्णिमा गदारिया आणि वैद्यकीय अधिकारी आर. एस. तोमर हे इंदौरमधल्या मनपूर इथल्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात काम करतात.
गदारिया यांनी आपला राजीनामा आरोग्य आयुक्त आकाश त्रिपाठी यांच्याकडे सुपुर्द केला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी मनिष सिंग यांनी सार्वजनिक
ठिकाणी गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे.

त्या म्हणाल्या, “तुम्ही तुमच्या कामासाठी प्रचंड मेहनत घेत असता आणि जेव्हा तुम्हाला कोणी सर्वांसमोर रागावतं, तुमच्यावर ओरडतं, तेव्हा तुम्हाला प्रचंड मानसिक तणाव येतो. मी माझं काम माझ्या संपूर्ण क्षमतेनं केलं आहे”.
मनिष सिंग यांनी सर्वांसमोर आम्हाला कामचुकार म्हटलं, तसंच तुम्ही फुकटचा पगार घेत आहात असेही आरोप केले. त्यांच्या बैठकांमध्येही कायम एकतर्फी संवाद असायचा, असा आरोप गदारिया यांनी केला आहे.

जिल्हाधिकारी मनिष सिंग यांना वारंवार फोन, मेसेज करुनही त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही. आरोग्य आयुक्त आकाश त्रिपाठी यांनी गदारिया यांचा राजीनामा स्विकारला नसल्याचं सांगितलं.

महिला आणि बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडेही मनिष सिंग यांच्याबद्दल तक्रार केली आहे. आपण दिलेल्या निवेदनात ते म्हणतात की ते अपशब्द आणि अश्लाघ्य भाषा वापरुन अपमान करतात आणि त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात. अशा अधिकाऱ्यासोबत आम्ही काम करु शकत नाही.
जर सरकारने कारवाई केली नाही तर शुक्रवारपासून काम थांबवण्याचा इशाराही या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

तर तोमर यांनी उपविभागीय दंडाधिकारी अभिलाष शर्मा यांच्यावर अश्लाघ्य भाषा वापरल्याचे आरोप केले आहे. तसंच त्याबद्दलची तक्रारही त्यांनी केली आहे. तोमर यांनी आपला राजीनामा दिलेला नाही.मात्र ते काही दिवसांच्या रजेवर गेले आहेत.