हेलिकॉप्टर कोसळून दोन पोलिसांचा मृत्यू

अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतात श्वेतवर्णीय राष्ट्रवाद्यांच्या एका मेळाव्यात परस्परविरोधी विचारांच्या निदर्शकांमध्ये चकमक झाली. त्यात एक मोटार गर्दीत घुसवण्यात आली तसेच निदर्शन स्थळापासून नजीकच पोलिस हेलिकॉप्टरही कोसळले. त्यात तीन ठार तर इतर १९ जण जखमी झाले.

शांततेने निदर्शने करणाऱ्या लोकांच्या मेळाव्यात एक मोटार घुसली. त्यात ३२ वर्षीय महिला ठार झाली तर व्हर्जिनिया येथे शार्लटव्हिले या निदर्शनांच्या ठिकाणापासून जवळच पोलिसांचे  हेलिकॉप्टर कोसळून दोन पोलिस ठार झाले. मोटार गर्दीत घुसवल्याच्या प्रकरणी वीस वर्षांच्या चालकास अटक करण्यात आली असून त्याच्यावर अप्रत्यक्ष खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनाइट दी राइट या श्वेतवर्णीय राष्ट्रवाद्यांनी शार्लटव्हिले येथील पार्कमधून रॉबर्ट ए ली यांचा पुतळा काढण्याच्या विरोधात निदर्शने आयोजित केली होती. या वेळी चकमक होऊन आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पोलीस व सुरक्षा दले दंगल आटोक्यात आणण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भयंकर घटना असल्याचे सांगत निषेध केला. न्यूजर्सी येथे डोनाल्ड ट्रम्प हे उन्हाळी सुटीसाठी आले असून त्यांनी तेथे पत्रकार परिषदेत सांगितले, की या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. हे माझ्याच काळात होते आहे असे नाही ओबामांपासून अनेक अध्यक्षांच्या काळात असा हिंसाचार होत आला आहे. कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करून निरपराध लोकांचे जीव वाचवणे यालाच आता प्राधान्य राहील. लोकांना समाजात वावरताना भीती वाटता कामा नये. ट्रम्प यांनी व्हर्जिनियाच्या गव्हर्नर टेरी मॅकालिफ यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण केले. शार्लटव्हिले येथे श्वेतवर्णीय राष्ट्रवादी, नव नाझी, कु क्लक्स क्लान अशा अनेक वर्ग पंथाचे लोक निदर्शनात सामील होते. काही दशकातील हा मोठा निषेध मेळावा होता. या मेळाव्याला विरोध करणाऱ्या निदर्शकांशी त्यांची चकमक झाली. या गटांनी एकमेकांवर बाटल्या फेकून घोषणाबाजी केली. येथे जी प्राणहानी झाली, त्याने माझे मन विदीर्ण झाले. सर्व लोकांना सदिच्छा देत असून त्यांनी घरी जावे असे शार्लटव्हिलेचे महापौर माइक सिंगर यांनी सांगितले. या हिंसाचाराची एफबीआय चौकशी करण्याची मागणी लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अँड ह्य़ुमन राइट्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनिता गुप्ता यांनी केली आहे.