भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेचे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. या मोहिमेदरम्यान एक अभिमानास्पद गोष्टही घडली, ती म्हणजे या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुथय्या वनिथा आणि रितू करिधल अशी चांद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिकांची नावे आहेत. यांपैकी वनिथा यांनी चांद्रयान-२ चे प्रोजेक्ट डायरेक्टर तर करिधल यांनी मिशन डायरेक्टर म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी आहे. यापूर्वी भारतात इस्रोच्या अतिमहत्वाच्या मोहिमेत अशा प्रकारे महिला शक्तीचा कधीही सहभाग नव्हता, त्यामुळेच पहिलांद्याच घडलेल्या या घटनेने भारतीय महिलांनी आपली हुशारी आणि ताकद जगाला दाखवून दिली आहे. झी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मुथय्या वनिथा या इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत त्यांचा या मोहिमेत अंत्यत महत्वाचा वाटा आहे. चांद्रयान-२च्या यशाला आणि अपयशाला त्याच कारणीभूत ठरणार होत्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाची ठरणारी चांद्रयान-२ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी करुन दाखवला आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेचे सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन हे यान अंतराळात झेपावले. चंद्रावर पोहचण्यासाठी या यानाला चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आले होते. त्यानंतर इस्रोने आज यशस्वी कामगिरी केली.