आंध्र प्रदेशच्या दंबारीकुडा भागात रविवारी दुपारी माओवाद्यांनी तेलगु देसम पार्टीच्या दोन नेत्यांची गोळया झाडून निघृर्ण हत्या केली. माओवाद्यांच्या गोळीबारात मरण पावलेले किदारी सर्वैश्वर राव हे अराकु विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर सिवरी सोमा हे माजी आमदार आहेत. सर्वेश्वरा राव यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. सीपीआय माओवादी स्थापना दिनाचा कार्यक्रम सुरु असताना या हत्या करण्यात आल्या. माओवाद्यांनी आठवडाभर २७ सप्टेंबरपर्यंत स्थापना दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.

किदारी सर्वेश्वरा राव यांनी वायएसआरसीपीच्या तिकिटावर अराकूमधुन आमदारकीची निवडणूक जिंकली पण नंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला. किदारी सर्वेश्वर राव आणि सिवरी सोमा हे दंबारीकुडाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ६० माओवाद्यांनी एकत्र येऊन हल्ला केला. यामध्ये महिलाही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.

नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या सर्व राजकारण्यांना नक्षलग्रस्त भागामध्ये जाण्यापूर्वी प्रशासनाला माहिती देण्यास सांगितले आहे असे ग्रामीणचे एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितले. आमदार किदारी सर्वेश्र्वरा राव आणि सोमा यांनी त्यांच्या भेटीची कोणतीही कल्पना दिली नव्हती असे शर्मा यांनी सांगितले. किदारी राव यांच्यावर बेकायद खाणकामाला प्रोत्साहन दिल्याच आरोप होता. बॉक्साईटच्या खाणकामाला पाठिंबा दिल्याबद्दल याआधी त्यांना माओवाद्यांनी धमकी सुद्धा दिली होती. मागच्या काही दिवसांपासून माओवादी या दोघांच्या मागावर होते. त्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.