आत्मघाती हल्ल्याचा कट उद्ध्वस्त 

लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी अल् कायदाशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. लखनौसह राज्याच्या अन्य शहरांमध्ये आत्मघाती हल्ले घडवण्याचा त्यांचा कट होता.

मिनाज अहमद आणि मसीरुद्दीन ऊर्फ मुशीर या अल् कायदाशी संबंधित ‘अन्सार गझवत-उल् -हिंद’ या संघटनेच्या दोन दशहतवाद्यांना दहशतवादविरोधी पथकाने लखनौमधून अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली. लखनौच्या गजबजलेल्या भागांत आणि इतर शहरांमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवण्याचा त्याचबरोबर स्मारकांसह सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानातील पेशावर आणि क्वेट्टा येथून या दहशतवादी कारवायांची सूत्रे हलवली असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. लखनौ जिल्ह्य़ातील काकोरी शहरात राहणाऱ्या मिनाज अहमद (३०) या दहशतवाद्याच्या घरात स्फोटके आणि पिस्तूल सापडले, तर जौनपूर जिल्ह्य़ातील मरियाहू शहरातील मसीरुद्दीन (५०)च्या घरातून मोठा शत्रसाठा जप्त करण्यात आला. त्यात स्फोटके आणि क्रूड बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आणखी काहींचा शोध सुरू

अल् कायदाचाच एक घटक असलेल्या ‘अन्सार गझवत-उल् -हिंद’ या संघटनेच्या माध्यमातून मिनाज आणि मसीरुद्दीन दहशतवादी कारवाया करीत होते. या संघटनेत लखनौ आणि कानपूरमधील आणखी काही युवक असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.