जम्मू काश्मीर येथील बारामुल्ला मध्ये असलेल्या किरी या ठिकाणी लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाला यश आलं आहे. दोन दहशतवादी या गावात लपून बसले होते. त्यानंतर आम्ही शोध मोहीम राबवली आणि या दोघांचाही खात्मा केला. अशी माहिती एएसपी इम्तियाज हुसेन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. आम्ही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र त्यांनी ते केले नाही. त्यांनी गोळीबार सुरु केला, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही गोळीबार केला ज्यात त्यांचा खात्मा करण्यात आला असेही हुसेन यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडे असलेली हत्यारं आणि दारुगोळा आम्ही जप्त केला आहे. या दोघांचीही ओळख पटणे बाकी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.