अमरनाथ यात्रेच्या पूर्वी करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला घेरले असून अद्यापही येथे शोध मोहिम सुरु आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.


डीजीपी वैद्य यांनी सांगितले की, कुलगाम जिल्ह्याच्या छाड्डर भान भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये ही धुमश्चक्री झाली. काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या अनंतनागमधील श्रीगुफारामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने ४ दहशतवाद्यांना ठार केले होते. या दहशतवाद्यांचा आयएसशी संबंध असल्याची बाब समोर आली होती. दरम्यान, छाड्डर भागात सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणावरील गोळीबारामुळे कुलगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

या मागील घटनेत मारले गेलेले दहशतवादी आयएसजेके (इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर) या संघटनेशी संबंधित असल्याची शंका डीजीपी वैद्य यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, आज ठार झालेले दहशतवादी हे काश्मीरचेच रहिवाशी आहेत. या ताज्या चकमकीत आयएसजेके या संघटनेचे नाव समोर आल्याने सुरक्षा एजन्सीजनेही कान टवकारले आहेत. आयसिस ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आता जम्मू-काश्मीरमध्येही आपले हातपाय पसरू पाहत आहे. या गोष्टीला यामुळे पुष्टी मिळाली आहे.

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये आयएसजेकेचा प्रमुख म्होरक्या दाऊदचाही समावेश होता. श्रीगुफारा येथील चकमकीत तीन दहशतवाद्यांचे मारले जाणे सुरक्षा रक्षकांसाठी मोठे यश होते. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या जकूरा भागात एका दहशतवादी संघटनेची जबाबदारी आयएसनेच घेतली होती. या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. त्यानंतर आयएससंदर्भात भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.