दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने दिलेल्या व्हिसावर अधिकृतरित्या पाकिस्तानात जाऊन दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन परतणाऱ्या दोन काश्मीरी तरुणांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. हो दोघे भारतात मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते.

बारामुल्ला पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल मजीद भट आणि मोहम्मद अशरफ मीर अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. या दोघांनी पाकिस्तानात जाऊन लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षणस्थळी जाऊन प्रशिक्षण घेऊन आले आहेत. वाघा बॉर्डरवर त्यांना भारतात प्रवेश करताना ५२ राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफच्या ५३व्या बटालियनने संयुक्तरित्या ताब्यात घेतले. वाघा बॉर्डरवर तपासणीदरम्यान संशयास्पद हालचालींवरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अधिक चौकशीनंतर त्यांनी पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे.

ज्या प्रशिक्षण केंद्रांवर या दोघांनी प्रशिक्षण घेतले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी मुलांनाही प्रशिक्षित केले जात असल्याचे या दोघांनी सांगितले. यामध्ये पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील १० ते १२ वर्षे वयोगटातील सर्वाधिक मुले आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील बरमा शहरात हे प्रशिक्षण केंद्र चालवले जात असून याला हंजाला अदनान आणि उमर या कोडवर्डचे नाव असलेला कामांडर चालवत आहे. तसेच जे इतर जे दहशतवादी या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत त्यांची नावे ओसामा, नावीद आणि हताफ अशी आहेत. नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी या दोघांना व्हिसा मंजूर केला होता.