भाजपाने सोमवारी लखनऊमधील आपल्या एका नेत्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. भाजपाच्या या नेत्याने पक्षाचं नेतृत्व गुजरातचे भामटे करत असल्याचं म्हटलं होतं. तसंच भाजपाने प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री अशीही टीका केली होती. भाजपाचे माजी प्रवक्ते आयपी सिंह यांनी एकामागोमाग एक ट्विट केले आहेत. ट्विटमध्ये आयपी सिंह यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आझमगढ येथून निवडणूक लढवत असल्याबद्दल कौतूक केलं असून प्रचारासाठी गरज असल्यास कार्यालय म्हणून आपल्या घराचा वापर करु शकता असं सांगितलं आहे.

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आयपी सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सहा वर्षांसाठी आयपी सिंह यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. आयपी सिंह यांनी केलेल्या ट्विट्सनंतर ही कारवाई कऱण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे एकीकडे भाजपाचे सर्व नेते ट्विटरवर नावापुढे चौकीदार लिहित असताना आयपी सिंह यांनी ‘उसूलदार’ असं लिहिलं आहे.

‘मी आदर्शवादी क्षत्रिय कुटुंबातील आहे. आपण शांत असताना गुजरातचे दोन भामटे गेल्या पाच वर्षांपासून हिंदी भाषिक लोकांची फसवणूक करत आहेत’, असं आयपी सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘आमच्या उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था गुजरातपेक्षा सहा पटीने मोठी आहे. उत्तर प्रदेशचं आर्थिक उत्पन्न पाच लाख कोटी असून गुजरातचं फक्त एक लाख 15 हजार कोटी आहे’, असं सांगताना आयपी सिंह यांनी अशा परिस्थितीत ते काय खाणार आणि काय विकास करणार असा टोला लगावला.

पुढच्या ट्विटमध्ये आयपी सिंह यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटलं की, आपण प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री ? देशाचे पंतप्रधान टी-शर्ट, चहाचे कप विकताना चांगले दिसतात का ?. भाजपाने आपल्या विचारसरणीने लोकांच्या ह्रदयात जागा निर्माण केली आहे. मिस्ड कॉल आणि टी-शर्टने कार्यकर्ते उभे करणं अशक्य आहे असंही आयपी सिंह यांनी म्हटलं.

निलंबन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आयपी सिंह यांनी आपण गेल्या तीन दशकांपासून पक्षासोबत आहोत. सत्य बोलणंदेखील पक्षात गुन्हा आहे. पक्षाने आपली विचारसरणी गमावली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदीजी मला माफ करा, मी तुमच्यासारखं डोळ्यावर पट्टी ठेवून चौकीदाराचं काम करु शकत नाही असं उत्तर त्यांनी दिलं आहे.