गुजरातच्या सूरतमध्ये पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं (एसबीआय) एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असताना या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोघांनी 10 लाख रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर सोसायटीमध्ये राहणारा प्रकाश धमैया नावाचा एक व्यक्ती मंगळवारी पहाटे एका अल्पवयीन तरुणासोबत गोडादरा येथील एसबीआयचं एटीएम फोडण्यासाठी गेला. त्यावेळी एटीएमच्या बाहेर एकही सुरक्षारक्षक तैनात नव्हता. ते दोघं एटीएमच्या आत गेले आणि एटीएमचं शटर बंद करुन घेतलं. सर्वप्रथम त्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला आणि त्यानंतर त्यांनी एटीएम फोडण्यास सुरूवात केली. मशिनच्या समोरील भाग त्यांनी जवळपास फोडला होता. पण त्याचवेळी तेथून पेट्रोलिंगसाठी निघालेले पोलीस जात होते. संशय आल्याने पोलीस तेथे थांबले आणि दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतलं.

अटक करण्यात आलेले दोघंही शेतकरी कुटुंबातून येतात, दोघांची स्वतःची जमीन आहे. पण प्रकाशच्या वडिलांना टीबीच्या आजाराने ग्रासलंय तसंच त्यांना अन्य अनेक आजार जडलेत. त्यांच्या उपचारासाठी 10 लाखांहून जास्त रक्कम खर्च झाली. त्यासाठी प्रकाशने स्वतःची जमिन नातेवाईकाकडे गहाण टाकून कर्ज घेतलं होतं. हे कर्ज त्याला फेडायचं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एटीएम फोडून चोरी करण्यासाठी दोघांनी युट्यूबवर व्हिडीओ पाहिले होते. अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी चोरीची आणि एटीएम फोडण्याची पद्धत शिकली. जर 20 ते 30 मिनिट उशीर झाला असता तर दोघं चोरी करण्यात यशस्वी झाले असते. अटक केलेल्या दोघांच्या नावावर यापूर्वी कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.