जम्मू-काश्मीरमधील शोपीया जिल्ह्यामधील किलोरा भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानाना यश आलं आहे. अद्यापही चकमक सुरू आहे. जवानांनी परिसरास वेढा दिलेला आहे.

किलोरा गावात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी शोधमोहीम सुरू केली होती. परिसरास वेढा दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू झाला. प्रत्युतरात जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अद्यापही या ठिकाणी चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भारतीय सुरक्षा संस्थाबरोबरच गुप्तचर संस्थांसमोर गुन्हेगारी व दहशतादाचे एक नवे रुप आले आहे. भारतीय सैन्य व गुप्तचर संस्थांच्या सर्तकतेमुळे पाकिस्तान, आयएसआय व दहशतवादी संघटनांना आपल्या कारवाया करण्यात अपयश येत आहे. यामुळे आता आयएसआय व दहशतवादी संघटनांनी भारतातील गुन्हेगारी जगताचा यासाठी वापर करणे सुरू केले आहे. देशात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आता स्थानिक गँगस्टर्सवर जबाबदारी सोपवली जात असल्याचे दिसून येत आहे.