करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने सरकारच्या चिंतेत वाढ झाली होती. रुग्णालायत ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत होता. मात्र असं असलं तरी करोना लसींचे दोन डोस घेतल्यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आहे. ९५ टक्के मृत्यू रोखण्यात लसींचे दोन डोस यशस्वी ठरले आहेत. तर एक डोस घेणाऱ्या लोकांच्या मृत्यूदरात ८२ टक्के घट झाल्याचं दिसून आलं. करोनाकाळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना लसींचे दोन डोस देण्यात आले होते. त्यामुळे सर्वात घातक अशा डेल्टा व्हेरिएंटपासून त्यांचं संरक्षण झालं, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी दिली.

करोनाची लस न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे २० टक्के होतं. एक डोस घेणाऱ्या पोलिसांमध्ये हे प्रमाण ७ टक्के होतं. तर दोन डोस घेणाऱ्या पोलिसात हेच प्रमाण ४ टक्के इतकं होतं. त्याचबरोबर ज्या पोलिसांनी लसीचा एक डोस घेतला होता, त्यांच्यातील प्रभाव क्षमता ही ८२ टक्के इतकी होती. तर दोन डोस घेणाऱ्या पोलिसात हे प्रमाण ९५ टक्के इतकं होतं. या अभ्यासात जवळपास १ लाख १७ हजार ५२४ पोलिसांची माहिती घेण्यात आली. त्यात १७ हजार ५९ पोलिसांनी लस घेतली नव्हती. तर एक डोस घेणाऱ्या पोलिसांची संख्या ही ३२ हजार ७९२ इतकी होती. त्याचबरोबर ६७ हजार ६७३ जणांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. लस न घेणाऱ्या प्रति १००० लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण १.१७ टक्के होतं. एक डोस घेणाऱ्या प्रति १००० लोकांमध्ये हेच प्रमाण ०.२१ टक्के इतकं होतं. दोन डोस घेणाऱ्या प्रति १००० लोकांमध्ये मृत्यूदर हा ०.०६ टक्के इतका होता. त्यामुळे करोना लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे लोकांचा मृत्यू होतोय; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फेसबुकवर संतापले

दुसऱ्या लाटेत सर्वाधिक डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झाला होता. त्यामुळे या अभ्यासामुळे लस प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. तिसऱ्या लाटेबाबतही व्ही के पॉल यांनी आपलं मत व्यक्त केलं. “पुढचे तीन ते चार महिने खूपच चिंतेचे आहेत. तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. सध्या लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. पुढच्या ३-४ महिन्यात सुरक्षित अवस्थेत पोहोचू. मात्र पुढचे १०० ते १२५ दिवस चिंता करणारे आहेत. त्यामुळे प्रशासन आणि लोकांनी एकत्रितपणे यासाठी प्रयत्न केले पाहीजेत”, असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनीही लसीकरण आणि नियम पाळण्याचं आव्हान यावेळी केलं.

Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार मांडणार ‘ही’ १५ विधेयके!

देशात दररोज करोनाची सुमारे ४० हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३८,०७९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आणि ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,९४९ आणि गुरुवारी ४१,८०६ करोना बाधित आढळून आले होते. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ४३,९१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे, म्हणजेच ६३९७ सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे.