युरोपात दोन लशींना डिसेंबरच्या उत्तरार्धात सशर्त परवानगी देणार असल्याचे युरोपीय समुदायाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हँडर लेन यांनी सांगितले, की मॉडर्ना व फायझरच्या लशींना युरोपीय वैद्यकीय संस्थेकडून सर्व अटी पूर्ण झाल्या तर मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर या लशी बाजारपेठेत प्रवेश करू शकतात. युरोपीय वैद्यक संस्था सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या संपर्कात असून लशींचे मूल्यमापन केले जात आहे. युरोपीय आयोगाने बायोएनटेक, फायझर या कंपन्यांसह अनेक औषध कंपन्यांशी लस पुरवठय़ाचा करार केला असून युरोपीय समुदायाच्या सदस्य देशांसाठी लशीचे कोटय़वधी डोस विकत घेण्याची तयारी करण्यात आली आहे. उर्सुला व्हॉन द लेन यांनी सांगितले,की या आठवडय़ाच्या सुरुवातीला युरोपीय आयोग मॉडर्ना लशीच्या उपलब्धतेसाठी करारास अंतिम रूप देणार आहे. सर्व काही सुरळीत पार पडले तर मॉडर्ना व फायझर या दोन कंपन्यांच्या लशींना डिसेंबरच्या उत्तरार्धात मंजुरी दिली जाईल, या लशी आपत्कालीन पातळीवर बाजारात आणल्या जातील.