एखाद्या विमानातील प्रवासी विमानाच्या आत छायाचित्रे घेत असल्याचे आढळल्यास त्या मार्गावरील विमानोड्डाण दोन आठवडय़ांसाठी स्थगित केले जाईल, असे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शनिवारी सांगितले.

अभिनेत्री कंगना राणावत प्रवास करत असलेल्या इंडिगोच्या चंदीगड- मुंबई विमानात माध्यम प्रतिनिधींनी सुरक्षेचे तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे कथित उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर, डीजीसीएने इंडिगो एअरलाइन्सला ‘योग्य ती कारवाई’ करण्यास सांगितले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे.

बुधवारी घडलेल्या या घटनेच्या ध्वनिचित्रफितीत,  विमानाच्या पुढच्या रांगेत बसलेल्या कंगनाची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार आणि छायाचित्रकार रेटारेटी करीत असल्याचे दिसत आहे.

विमान नियमावली १९३७च्या नियम १३ अन्वये, डीजीसीए किंवा हवाई वाहतूक मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कुणाही व्यक्तीला विमानाच्या आत कुठलेही छायाचित्र काढण्यास परवानगी नाही.