शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी अजूनही महिलांना संघर्ष करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी शबरीमाला मंदिराच्या दिशेने निघालेल्या दोन महिला मंदिराजवळ पोहोचल्या आहेत. पण त्यांना अजून मंदिरात प्रवेश मिळालेला नाही. मंदिर परिसरात संघर्षाची स्थिती कायम असून आंदोलकांकडून या महिलांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले केले असले तरी अजूनही महिलांना या मंदिरात प्रवेश मिळू शकलेला नाही. आज तिसऱ्या दिवशीही शबरीमाला मंदिर परिसरात तणाव कायम आहे. दोन महिलांचा अयप्पा मंदिरात जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आज शुक्रवारी आणखी दोन महिला शबरीमाला मंदिराच्या दिशेने निघाल्या आहेत.

हैदराबाद स्थित मोजो टीव्हीच्या पत्रकार कविता जाक्काल आणि सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या दोघी शबरीमाला मंदिराच्या दिशेने निघाल्या आहेत.

या दोन्ही महिलांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास १५० पोलीस या महिलांसोबत चालत आहेत. हल्ला होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही महिलांनी डोक्यात हेल्मेट आणि लाईफ जॅकेट घातले आहे. सान्नीधानम येथे आंदोलन सुरु आहे. आम्हाला शबरीमाला मंदिर परिसरात भक्तांबरोबर कोणताही वाद नकोय. आम्ही फक्त कायद्याचे पालन करत आहोत असे पोलीस महानिरीक्षक एस.श्रीजित यांनी सांगितले. एस.श्रीजित आंदोलकांशी चर्चा करुन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आंदोलक काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आम्ही महिलांना मंदिरात प्रवेश करु देणार नाही. त्यासाठी आम्ही मरायला तयार आहोत असे या आंदोलकांनी सांगितले.

केरळच्या शबरीमाला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिक लोक याचा विरोध करीत आहेत. बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर महिलांना येथे प्रवेशापासून रोखण्यात आले. दरम्यान, पंबा येथील डोंगर चढून वार्तांकनासाठी मंदिरात प्रवेश करु पाहणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सच्या महिला पत्रकार सुहासिनी राज आणि त्यांच्या पुरुष सहकाऱ्याला आंदोलकांनी अडवले, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि दगडफेक करीत परत पाठवून दिले.

न्यूयॉर्क टाइम्ससोबत काम करणारी महिला पत्रकार सुहासिनी राज आणि त्यांचे सहकारी पत्रकार पंबा येथील डोंगरावर ट्रेकिंग करुन शबरीमाला मंदिरापर्यंत पोहोचले होते. गुरुवारी ज्यावेळी ते मंदिराच्या जवळ पोहोचले तर तेथील आंदोलकांच्या मोठ्या विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. या दोघांनाही आंदोलकांनी रोखले. त्यांनी आंदोलकांना सांगितले की आम्ही मंदिरप्रवेशासाठी नव्हे तर आपले काम करण्यासाठी आलो आहोत. मात्र, तरीही त्यांना आंदोलकांनी पुढे जाऊ दिले नाही, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली त्यामुळे इतक्या मेहनीतनंतरही नाइलाजाने त्यांना पुन्हा मागे परत फिरावे लागले.