पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात 150 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या 2 वर्षांच्या चिमुरड्याला मंगळवारी सकाळी तब्बल 109 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संगरूर जिल्ह्यातील भगवानपुरा गावात फतेहवीर सिंह नावाचा 2 वर्षाचा चिमुरता घराजवळ खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी एक टीम रवाना करण्यात आली होती. तसेच घटनास्थळी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या अँम्ब्युलन्ससह डॉक्टरांची टीमही तैनात करण्यात आली होती.

दरम्यान, 109 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या चिमुरड्याला सकाळी पाच वाजता बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. परंतु कुटुंबीयांना त्याची हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एनडीआरएफच्या टीमने घटनास्थाळी धाव घेत चिमुरड्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सुरूवातीला त्यांच्याकडून फतेहवीरला बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर करण्याचा विचार निर्णय घेण्यात आला होता. ती दोरी चिमुरड्याच्या हातापर्यंत पोहोचली होती तरी दुखापत झाली असेल या शक्यतेमुळे पहिल्या दिवशी निर्णय रद्द करण्यात आला.

या पद्धतीचा त्यानंतरही पुन्ही अवलंब करण्यात आला होता. परंतु एनडीआरएफच्या टीमला त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर बोअरवेललाच समांतर बोअरवेल तयार करून बोगदा करून त्या बोअरवेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती संगरूरचे उपायुक्त घनश्याम थोरी यांनी दिली. एनडीआरएफच्या टीमसोबत डेरा सच्चा सौदाच्या 200 स्वयंसेवकांनी समांतर बोअरवेल तयार करण्यासाठी सहभाग घेतला होता. दरम्यान, समांतर बोअरवेल तयार करून त्या 36 इंचाचे काँक्रिटचे पाईप टाकण्यात आले होते.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्व डीसींकडून बोअरवेलच्या संबंधित अहवाल मागवला असल्याची माहितीही त्यांनी दिली.