Two Years After Demonetisation: नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसतर्फे देशभरात आज (गुरुवारी) निदर्शनं केली जाणार असतानाच काँग्रेसने सोशल मीडियावरुनही मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘नोटबंदी का सच जनता ने जाना, भुगतान की अब तुम्हारी बारी’, असे ट्विट करत काँग्रेसने भाजपावर टीकास्त्र सोडले. तर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी लोकसभा निवडणुुकीच्या वेळी नोटाबंदीला विसरु नका, असे म्हटले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ८ नोव्हेंबर हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. गुरुवारी सकाळपासूनच काँग्रेसने सोशल मीडियावर मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचा #DestructionByDemonetisation हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता.

‘नोटाबंदीमुळे काळ्या पैशावर चाप बसला नाही. बनावट नोटा आणि दहशतवाद्यांना वित्तपुरवठा सुरुच आहे. नोटाबंदीचे सत्य जनतेला समजले असून आता सरकारला भोगावं लागेल’, असे ट्विट त्यांनी केले.

दुसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, नोटाबंदीच्या काळात एकीकडे बँकेसमोरील रांगेत नागरिकांचे प्राण जात होते. तर दुसरीकडे भाजपाशी संबंधित लोक बँकेच्या मागच्या दरवाज्यातून स्वत:ची तिजोरी भरत होते.

नोटाबंदीत मोदींनी घोटाळा केला असून देशाच्या गरीब जनतेला याचा फटका बसला. या निर्णयासाठी मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था संकटात आली. आता पंतप्रधानही नोटाबंदीबाबत बोलणं टाळतात. इतिहासात नोटाबंदी हा काळा दिवस ठरला असून लोकसभा निवडणुकीत मतदान करताना नोटाबंदीच्या निर्णयाचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.