News Flash

मोदी २.० सरकार सर्वेक्षण : हो, मोदी सरकारने करोनापेक्षा निवडणुकांना दिलं अधिक महत्त्व

Modi government 2.O : मोदी सरकारच्या कामाचं जनतेकडून मूल्यमापन

दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'लोकसत्ता डॉट कॉम'ने सर्वक्षण केलं. ११ हजार ५१४ जणांनी विविध मुद्द्यावर सरकारच्या कामाचं मूल्यमापन केलं. (मूळ छायाचित्र। पीटीआय)

करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अभूतपूर्व भयावह अशी परिस्थिती निर्माण केली. आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. हजारो लोकांचे बळी गेले. बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजनसाठी खस्ता खाऊनही अनेकांना आपल्या प्राणप्रिय व्यक्तींना वाचवता आलं नाही. देशात सगळीकडे उपचारांसाठी टाहो उमटत असताना पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी २.० सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या तोंडावर ही अभूतपूर्व परिस्थिती बघायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने सर्वेक्षण केलं. ११ हजार ५१४ जणांनी विविध मुद्द्यांवरून सरकारच्या कामाचं मूल्यमापन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए दुसऱ्यांदा सत्तेत आली. दुसऱ्यांदा सत्तेत येऊन सरकारला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सरकारचं मूल्यमापन करणारं एक ऑनलाईन सर्वेक्षण केलं. यात करोनाशी संबंधित परिस्थितीवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर सहभागी नागरिकांनी आपली मतं नोंदवली.

सर्वेक्षणात ‘करोना महामारीची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार यशस्वी झालंय असं वाटतं का?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सहभागी नागरिकांनी सरकार करोना परिस्थिती हाताळण्यात यशस्वी झालं नाही म्हणजेच अपयशी ठरलं असल्याचं म्हटलं आहे. ६२.४ टक्के नागरिकांनी हे मत मांडलं आहे. तर ३४.३ टक्के लोकांनी सरकार परिस्थिती हाताळण्यात यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. ३.३ लोकांनी तटस्थ भूमिका मांडली आहे.

two years of Modi 2.0

करोनाच्या दुसऱ्या लाटेतच लस तुटवड्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला. याच्याशी संबंधित ‘लसींच्या तुटवड्याला मोदी सरकार जबाबदार आहे, असं वाटतं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ६३.३ टक्के लोकांनी मोदी सरकार लस तुटवड्यासाठी जबाबदार धरलं आहे. तर ३४.६ टक्के लोकांनी लस तुटवड्याला मोदी सरकार जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. तर २.१ टक्के लोकांनी मात्र, तटस्थ भूमिका मांडली आहे.

मोदी 2.0 सरकार सर्वेक्षण : अबकी बार गडकरी… पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या मनात गडकरीच

two years of Modi 2.0

सर्वेक्षणात ‘मोदी सरकारने करोनापेक्षा विधानसभा निवडणुकांना जास्त महत्त्व दिलं असं वाटतं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ७०.५ टक्के लोकांनी सरकारने करोनाच्या परिस्थितीपेक्षा विधानसभा निवडणुकांना अधिक महत्त्व दिल्याचं म्हटलं आहे. २६ टक्के लोकांनी मात्र, या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिलं आहे. करोनापेक्षा निवडणुकांना अधिक महत्त्व दिलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर ३.५ टक्के लोकांनी यावर तटस्थ भूमिका मांडली आहे.

two years of Modi 2.0

करोना परिस्थिती हाताळण्यात सरकारची सुमार कामगिरी…

राष्ट्रीय आपत्तीसारख्या करोना परिस्थितीत मोदी सरकारने समाधानकारक काम केलं नसल्याचंही या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. ‘करोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भात मोदी सरकारला १०० पैकी किती गुण द्याल?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ५४.३ टक्के लोकांनी ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण दिले आहेत. तर १० टक्के लोकांनी ३५ ते ५० टक्के गुण दिले आहेत. ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान गुण देणाऱ्यांची संख्या १२.८ टक्के आहे, तर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण देणाऱ्यांची संख्या २२.८ टक्के आहे.

two years of Modi 2.0

पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींना सर्वाधिक पसंती

याच सर्वेक्षणात ‘तुमच्या मते भाजपाचा कुठला नेता पंतप्रधान म्हणून सर्वोत्कृष्ट आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ११,५१४ जणांपैकी ६ हजार ३०० जणांनी म्हणजेच ५४.७ टक्के लोकांनी गडकरी हे सर्वोत्तम निवड असल्याचं मत नोंदवलं. त्यानंतर ३२.३ टक्के नरेंद्र मोदी, तर ०.७ टक्के लोकांनी अमित शाह योग्य आहेत, असं मत व्यक्त केलं. मोदींना ३ हजार ७१९ जणांनी पसंती दिली, तर शाह यांना केवळ ७७ जणांनी मत दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे गडकरी, मोदी, शाह यांच्यापैकी कोणताही नेता योग्य नसल्याचं मत नोंदवणाऱ्यांची संख्या १२.३ टक्के होती. एक हजार ४१८ जणांनी या तिघांपैकी कोणताही भाजपाचा नेता पंतप्रधान म्हणून चांगला नसल्याचं मत नोंदवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 1:51 pm

Web Title: two years of modi 2 0 modi government survey coronavirus crisis govt response to covid 19 handling bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नवीन डिजिटल नियमावलीबाबत Google चे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले…
2 सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमावलीमुळे लोकांनी घाबरू नये; केंद्रानं मांडली भूमिका
3 लस घेतली तरच पगार….अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद
Just Now!
X