News Flash

काँग्रेसशासित राज्यांकडून लशींबाबत शंका घेण्याचे प्रकार

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना प्रत्युत्तर

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन. (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)

लोकांना लस देण्याऐवजी काँग्रेसशासित राज्यांनी लसीकरणाबाबत शंका घेऊन दुसरी लाट पसरण्यास हातभार लावला, असे प्रत्युत्तर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर दिले आहे. या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वर्धन यांनी सांगितले,की वरिष्ठ काँग्रेस नेते असलेल्या मनमोहन सिंग यांच्या पत्राचा मसुदा तयार करणाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस तडा जाईल असाच मजकूर लिहिला आहे.

लसीकरणाचे महत्त्व मनमोहन सिंग यांना कळते हे मान्य केले तरी काही काँग्रेस नेत्यांनी सार्वजनिक पातळीवर बेजबाबदार वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण, आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण काँग्रेस शासित राज्यात कमी प्रमाणात झाले.  मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात कोविड- १९ पेचप्रसंग हाताळण्यासाठी पाच उपायांचा उल्लेख केला होता. त्यात, लसीकरण वाढवण्यावर भर देणे व औषधांचा पुरवठा वाढवणे यांचा समावेश होता. त्यावर वर्धन यांनी म्हटले आहे, की काँग्रेस पक्षात जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी तसेच काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांनी तुम्ही जे म्हटले आहे ते कधीच म्हटलेले नाही. किंबहुना त्यांना तुमचा हा सल्ला मान्य नव्हता. कसोटीच्या काळात वैज्ञानिक, लस उत्पादक, आरोग्य कर्मचारी यांनी नेटाने काम केले होते, त्याची दखल काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली नाही. उलट काँग्रेस नेत्यांनी लशींच्या परिणामकारकतेबाबत वावड्या उठवल्या. त्यामुळे लोकांनी लसीकरणापासून आखडता हात घेतल्याचे  हर्षवर्धन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:04 am

Web Title: types of suspicion about vaccines from congress ruled states abn 97
Next Stories
1 नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण
2 दुहेरी उत्परिवतर्नचा विषाणू आता देशात सार्वत्रिक
3 मोठा निर्णय : १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस; १ मे पासून व्यापक लसीकरण मोहीम
Just Now!
X