कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याचे सांगून कॉंग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांनी फसवणूक केल्याची तक्रार अमेरिकेतील दूरसंचार क्षेत्रातील एका कंपनीने एफबीआयकडे केलीये. ११ लाख डॉलरची फसवणूक केल्याचा आरोप कंपनीने टायटलर यांच्यावर केलाय.
टायटलर यांचा मुलगा सिद्धार्थ यांच्यासोबत अमेरिकेतील टीसीएम मोबाईलची उपकंपनी कोअरविप यांनी करार केला. शस्त्रास्त्रांची दलाली करणाऱा अभिषेक वर्मा हा देखील या करारात भागीदार होता. कोअरविपला सिद्धार्थ आणि वर्मा यांच्यासोबत भारतातील ग्रामीण भागासाठी व्हाईसओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल प्रकल्प सुरू करायची होता. हीच प्रकल्प सुरू करण्यापूर्वी टायटलर यांनी गांधी घराण्याशी आपले चांगले संबंध आहेत, असे आश्वासन अमेरिकी कंपनीला दिले होते. वर्मा यांनी टायटलर यांच्यासोबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक २००९ मध्ये आयोजित केली होती.
दरम्यान, टायटलर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. कॉंग्रेसमधील कोणत्याही नेत्याशी आपले चांगले संबंध आहेत, असे मी कधीही म्हटले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
टीसीएम मोबाईल कंपनीने एफबीआयसोबतच भारतातील तपासयंत्रणांकडेही या संदर्भात तक्रार केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 11:02 am