सीरियामध्ये गेली पाच वर्षे चाललेला संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने एकमताने मंजूर केला.
सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेल्या १५ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हा ठराव तयार करून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांना सादर केला. त्याबरोबरच शांतता प्रक्रियेचे वेळापत्रकही ठरवण्यात आले. त्यानुसार सीरियातील विविध संघर्षग्रस्त गटांमध्ये प्राधान्याने शस्त्रसंधी घडवून आणावा आणि पुढील महिन्यात (जानेवारी २०१६) या गटांमध्ये चर्चा सुरू करावी, असे ठरले. पुढील सहा महिन्यांत सीरियात संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सर्वसमावेशक, जबाबदार व खात्रीशीर प्रशासन स्थापन करावे, येत्या १८ महिन्यांत तेथे मुक्त वातावरणात निवडणुका घ्याव्यात आणि या संक्रमणात सीरियातील जनतेच्या इच्छा-आकाक्षांना प्राधान्यक्रम देण्यात यावे, असे या ठरावात म्हटले आहे. शांतता प्रक्रियेवर कशी देखरेख ठेवावी, याबाबतचा आराखडा बान की मून १८ जानेवारीपर्यंत सादर करणार आहेत.
आयसिस आणि अल-नस्र फ्रंट या गटांना चर्चेत सामील करण्यास मज्जाव केला आहे. त्यांच्यावर अमेरिका, रशिया यांच्यासह अन्य देशांचे हवाई हल्ले सुरूच राहणार आहेत.