पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पायरी सांभाळून बोलावे अन्यथा त्यांची गत सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यासारखी करून टाकू, असा इशारा भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी दिला आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला ममता बॅनर्जी यांचा विरोध असल्याने त्यांनी ही टीका केली. सिंह हे बैरियाचे आमदार असून त्यांनी तृणमूल नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशचे पंतप्रधान व्हावे असा सल्ला दिला.

ममता बॅनर्जी यांनी जी वक्तव्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत केली आहेत त्यावरून त्यांना परकीय शक्तींचा पाठिंबा असल्याचे दिसते,असे सिंह यांनी शनिवारी कृषी मेळ्याच्या निमित्ताने वार्ताहरांशी बोलताना सांगितले. ममता बॅनर्जी यांना त्यांचे वाईट दिवस जवळ येत चालल्याचा विसर पडलेला दिसतो, असे सांगून ते म्हणाले,की त्यांनी भाषा व वर्तन बदलावे अन्यथा त्यांची गत तिहार तुरूंगात टाकण्यात आलेले माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यासारखी करू.

१३ सप्टेंबरला ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात मोर्चा काढला होता, त्यानंतर त्यांनी असे म्हटले होते,की पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रम होऊ देणार नाही. आमदार सिंह यांनी सांगितले, की ममता जर बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना पाठीशी घालण्याचे राजकारण करणार असतील तर त्यांनी बांगलादेशचे पंतप्रधान व्हावे. पश्चिम बंगालमध्ये राम व हनुमानाच्या रूपात आता अमित शहा व योगी आदित्यनाथ अवतरले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत बॅनर्जी यांची सत्ता संपलेली असेल.