27 September 2020

News Flash

अमेरिका भारतात सहा अणुभट्टय़ा उभारणार

मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी अमेरिकन प्रतिनिधी गृहातही त्यांचे भाषण होणार आहे.

  अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वॉशिंग्टन येथे गळाभेट घेतली.

नागरी अणुऊर्जा करारानंतर पुढचे पाऊल टाकत अमेरिका भारतात सहा अणुभट्टय़ा उभारणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात मंगळवारी झालेल्या भेटीत हा निर्णय घेण्यात आला.

या पाश्र्वभूमीवर आण्विक पुरवठादार देशांच्या (न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप -एनएसजी) गटाचे सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी अमेरिकेने मंगळवारी पाठिंबा दिला आहे तसेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम’ (एमटीसीआर) या ३४ देशांच्या गटाचे दरवाजे भारतासाठी उघडण्यासही अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी अमेरिकन प्रतिनिधी गृहातही त्यांचे भाषण होणार आहे. मोदी आणि ओबामा यांची भेट ओव्हल कार्यालयात झाली. मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून उभय नेत्यांमधली ही सातवी भेट आहे.

जागतिक तापमान बदल, आण्विक सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धची लढाई यासह विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका या सर्व प्रश्नांवर एकमेकांना सहकार्य करणार असल्याचे या भेटीत ठरले. विकसनशील देशांसाठी भारत आणि अमेरिकेतील सहकार्य मदतीचे ठरेल आणि भविष्यातही दोन्ही देश एकत्रित काम करतील, अशी ग्वाही ओबामा यांनी या वेळी दिली.

‘व्हाइट हाऊस’मध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत मोदी यांनी ओबामा यांचे सहकार्याबद्दल जाहीर आभार मानले. दोन मोठी लोकशाही असलेल्या देशांमधील संबंध अधिकाधिक दृढ होणे स्वाभाविक आहे, असे ओबामा म्हणाले तर मोदी यांनी आर्थिक संबंध नव्या पातळीवर नेण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. सायबर सुरक्षेबाबतही मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे ओबामा म्हणाले.

आपल्याला ऊर्जा, त्यांना नोकऱ्या

  • भारताचे अणुऊर्जा महामंडळ आणि अमेरिकेची वेस्टिंगहाऊस ही कंपनी यांच्या वतीने भारतात या सहा अणुभट्टय़ा उभारल्या जातील.
  • जून २०१७पर्यंत यासाठीचे करारनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यामुळे भारताला स्वच्छ ऊर्जा लाभेल तर हजारो अमेरिकनांना रोजगार लाभेल, असे अमेरिकन अध्यक्षांच्या प्रसिद्धी सचिवांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 4:12 am

Web Title: u s firm to build six nuclear reactors in india
Next Stories
1 धमकी देऊन निवेदन घेतल्याचा रिकी मार्टिनचा दावा
2 दिवंगत अंतराळवीर कल्पना चावलाच्या समाधिस्थळी पंतप्रधानांकडून आदरांजली
3 नेपच्यूनच्या पलीकडे नववा ग्रह असण्याची शक्यता
Just Now!
X