उत्तर कोरियाने यशस्वीपणे पहिलीच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर त्याविरुद्ध अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांनी एकत्रितपणे जागतिक पातळीवर त्याविरुद्ध एल्गार पुकारण्याचे ठरविले आहे.

उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतल्याने त्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क जेन-ह्य़ू आणि जपानचे अध्यक्ष शिंझो अबे यांच्याशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवरून चर्चा केली.

उत्तर कोरियाच्या वर्तनाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रितपणे एल्गार पुकारण्याचा निर्धार या तीनही नेत्यांनी व्यक्त केला, असे व्हाइट हाऊसमधून सांगण्यात आले.

ओबामा यांनी पार्क यांना दूरध्वनी केला असता दोन्ही नेत्यांनी उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीचा निषेध केला.

उत्तर कोरियाच्या या कृत्यामुळे संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत करण्यात आलेल्या ठरावासह आंतरराष्ट्रीय बांधिलकीचे उल्लंघन झाले असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनीही दक्षिण कोरिया आणि जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी हायड्रोजन बॉम्ब चाचणीबाबत चर्चा केली.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने तातडीने बोलाविलेल्या बैठकीत उत्तर कोरियाला नव्याने र्निबध लादण्याचा इशारा दिला.

उत्तर कोरियाची कृती आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना सरळ धोका असल्याचेही म्हटले आहे.