करोना व्हायरसच्या प्रसारापासून अमेरिक चीन संबंध कमालीचे ताणले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाहीर सभांमधून चीनवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान दोन्ही देशातील बिघडत चाललेल्या संबंधांना आणखी एक धक्का लागला आहे. अमेरिकेने चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास ७२ तासांच्या आत बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी याची माहिती दिली.

अमेरिका व चीन यांच्यातील संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. चीनविरोधात टीका करणाऱ्या ट्रम्प प्रशासनानं चीनला थेट ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन याविषयी बोलताना म्हणाले,”ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्यासंबंधी चीनला मंगळवारी माहिती देण्यात आली. अमेरिकेनं हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह चीननं केला आहे. नाहीतर चीनही या निर्णयाविरोधात आवश्यक व योग्य पावलं टाकेल,” असा इशारा चीननं अमेरिकेला दिला आहे.

आणखी वाचा- “करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारत असतानाच….”, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

“अमेरिकेकडून हा एकतर्फी आणि चिथावणीखोर पाऊल टाकले जात आहे. जे की एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि द्विपक्षीय कराराचं उल्लंघन करणारं आहे. हे चुकीचं पाऊलं असून, यामुळे दोन्ही देशातील संबंध खराब होतील. अमेरिकेच्या निर्णयावर चीनकडून टीका करण्यात आली आहे,” असंही वांग वेन्बिन म्हणाले.

आणखी वाचा- चीनने सर्वात प्रथम लस विकसित केली तर त्यांच्यासोबत काम करणार का? डोनाल्ड ट्रम्प म्हणतात….

अमेरिकेच्या आदेशानंतर चीनच्या दूतावासात जाळण्यात आली कागदपत्रे

अमेरिकेनं चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिल्याच्या काही वेळानंतर दूतावासात कागदपत्रे जाळण्यात आली. यासंदर्भात केपीआरसी या स्थानिक वृत्तवाहिनीनं एक व्हिडीओ जारी केला होता. यात दूतावास परिसरात अंधारात कागदपत्रे जाळण्यात आल्याचं दिसत असून, त्यामुळे धूर झाला होता. त्यानंतर पाणी टाकून ते विझवण्यात आले. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागानं या वृत्ताला दूजोरा दिला आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाला दूतावासात प्रवेश देण्यात आला नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.