भारताने हार्ले डेव्हिडसन या मोटारसायकलसह अनेक अमेरिकी वस्तूंवर १०० ते १२० टक्के आयात शुल्क लावले आहे. मात्र हे आपल्याला मान्य नाही असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलसह अनेक अमेरिकी वस्तूंवर भारतात १०० टक्के आयातशुल्क आहे. ट्रम्प यांनी याआधीही आयात शुल्कावरून भारतावर टीका केली होती. आता त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य तो निर्णय घ्यावा असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

५ एप्रिल रोजी नॅशनल रिपब्लिक काँग्रेशेनल कमिटीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख सातत्याने टेरिफ किंग असा केला. भारत हा जगातील सर्वात जास्त कर लादणारा देश आहे. ते १०० टक्के कर लादतात असे ट्रम्प यांनी त्यावेळी म्हटले होते. आता इतक्या मोठ्या प्रमाणात लादले जाणारे आयात शुल्क मान्य नाही, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरविचार करायला हवा असे मत ट्रम्प यांनी मांडले आहे. जी २० परिषदेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.

अमेरिकेने मागील वर्षी स्टील आणि अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या काही वस्तूंवरचे आयातशुल्क वाढवले होते. याच्या उत्तरादाखल भारतानेही अमेरिकी वस्तूंवरचे आयात शुल्क वाढवले. आमच्या २८ उत्पादनांवरचे आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. मात्र हे आयात शुल्क जाचक आहे, जी २० परिषदेत आमची या विषयावर सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.